‘भारतीय लोकशाही समोर आव्हाने"

 ‘भारतीय लोकशाही समोर आव्हाने"








‘भारतीय लोकशाही समोर आव्हाने ‘ या विषयाची चर्चा करावीशी वाटणे याचा अर्थ ही आव्हाने आहेत हे उघड आहे.भारतीय राज्यघटना आणि त्यातील संसदीय लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाला आज ही आव्हाने जाणवत आहेत. भारतीय राज्यघटनेचा आणि राजकारणाचा लोकशाही हा केंद्रबिंदू आहे. आज लोकशाही मार्गाने निवडणुका होत असल्या तरी कारभार मात्र  हुकूमशाही आणि एकचालकानूवर्तीत्वाची जोपासना करणारा दिसत आहे. भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य, सार्वभौमत्व ,संघराज्यीय एकात्मता ,धर्मनिरपेक्षता ,समाजवाद, लोकशाही ही मूलभूत तत्वे म्हणून सरनाम्यात समाविष्ट केली आहेत.मात्र या प्रत्येक मूल्याला आज तडे दिले जात आहेत. स्वातंत्र्याचा अर्थ स्व -तंत्र असा घेतला जातो आहे.आपले म्हणणे पुढे रेटत असताना दुसऱ्याच्या अधिकाराचा संकोच केला जात आहे. सार्वभौमत्वामध्ये अंतिम सत्ता लोकांची गृहीत आहे.मात्र लोकांना सत्तेऐवजी फक्त गृहीत धरले जात आहे. संघराज्यीय एकात्मता हे  तत्व केंद्र- राज्य संबंधाच्या तणावातून आज अडचणीत आणले जात आहे.धर्मनिरपेक्ष त्याऐवजी धर्म राष्ट्राचा डंका पिटला जात आहे.मानवी कारुण्यावर नव्हे तर आर्थिक समतेवर आधारित समाजवादाच्या संकल्पने ऐवजी कमालीच्या विषमतावादी भांडवलशाहीचा पुरस्कार केला जात आहे.आणि लोकशाही अत्यंत पद्धतशीरपणे हुकुमशाहीच्या मार्गाने नेली जात आहे.ही आव्हाने भारतीय राज्यघटने समोर पर्यायाने या देशाच्या लोकांसमोर आज उभी आहेत.याचाच अर्थ ही सर्व आव्हाने भारतीय लोकशाही समोरीलच आहेत.

लोकशाहीची परवड सुरू आहे हे उघड आहे. त्याचे एक कारण सत्ताधाऱ्यांची मनमानी हे जसे आहे तसे निवडणूक कायद्यातील उणिवा हे ही आहे.लोकशाहीच्या महत्वाच्या पैलूंच्या लोकप्रबोधनाचा अभाव आहे. अर्थात हे असले तरीही आपण स्वीकारलेली संसदीय लोकशाही पद्धत अधिक लोकाभिमुख आहे हे निश्चित.कारण ती सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांचा माज उतरवते हा इतिहास आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी एकदा म्हटलं होतं ,’ हुकूमशाहीत दमनाची भीती असते तर लोकशाहीत  प्रलोभानाची भीती असते.’ आज लोकशाहीला दमन आणि प्रलोभन या दोन्हीचाही धोका जाणवतो आहे. वास्तविक आपण राजेशाही ,साम्राज्यशाही घालवून लोक शक्तीच्या बळावर  लोकशाही प्रस्थापित केलेली आहे.म्हणूनच हे राष्ट्र प्रजासत्ताक नव्हे तर  ‘लोकसत्ताक ‘ आहे. जिथे राजा तिथे प्रजा असते.लोकशाहीमध्ये लोकांची सत्ता असते हे या निमित्ताने आपण लक्षात घेतले पाहिजे. सत्तेचे अंतिम मालक ‘लोक’ असतात निवडून दिलेली मंडळी ‘कारभारी’ असतात हे गृहीत आहे.कारभारी चुकले तर त्याला जाब मालक विचारु शकतो.मात्र आज निवडून दिलेली कारभारी मंडळीच मालकाप्रमाणे, राजाप्रमाणे ,हुकूमशहा प्रमाणे वागू लागली हे लोकशाहीसमोरील मोठे आव्हान आहे.

संसदीय लोकशाहीमध्ये लोकांनी मतदान करायचे नसते तर  ‘मताधिकार’ बजावायचा असतो. मत ही दान द्यायची वस्तू नाही तर तो आपला अधिकार आहे.आज स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही सार्वत्रिक निवडणुकीत पन्नास ते साठ टक्केच लोक मताधिकार बजावतात हे चांगले लक्षण नाही. सहकारी संस्थांच्या निवडणुकांत नव्वद ते शंभर टक्के मताधिकार बजावला जातो.पण विधानसभा -लोकसभा च्या निवडणुकीत ते का होत नाही याची कारणे शोधून त्या कारणांचे निराकरण करणे हे लोकशाही समोरील आव्हान आहे. दुर्जनांच्या क्रियाशीलता पेक्षा सज्जनांची निष्क्रियता आज मोठी आहे. निवडणूक उमेदवार केंद्रित नव्हे तर मतदार केंद्रित झाली पाहिजे.राजकीय पक्षांचे जाहीरनामे ठीकच पण  ” मतदारांचा जाहीरनामा “हवा. त्यावर चर्चा झाली पाहिजे.मतदार जेवढा जागृक तेवढी लोकशाही सक्षम होऊ शकते हे सत्य आहे.

लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा निवडणूक आणि खर्च यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी काळा पैसा गुन्हेगरी यांचं साटंलोटं दिसत आहे .पूर्वी उमेदवारांना गुन्हेगार सहकार्य करायचे मात्र आता गुन्हेगार असलेल्या उमेदवारांचेच प्रमाण धक्कादायक पद्धतीने वाढत आहे. कुसुमाग्रजांनी एका कवितेत म्हटलं होतं , ‘थैलीत लोकशाही जेव्हा शिरे धनाच्या ,तेंव्हा महासतीची वारांगनाच होई ‘.आज सर्वसामान्य लोक खंक होत आहेत ,आणि सत्तेचे भोई असलेले उद्योगपती गुणकाराच्या श्रेणीने अतिश्रीमंत होत आहेत.देशातील ,जगातील नावकोटांची  यादी प्रसिद्ध होते,पण सरकारी धोरणाने पाताळात कितीजण गाडले गेले,बेरोजगार किती झाले, आत्महत्या किती झाल्या याची यादी येत नाही. हे भयावह वास्तवही लोकशाही समोरील आव्हान आहे.

तत्वाविना राजकारण, श्रमाविना संपत्ती ,नीतीविना व्यापार, चारित्र्याविना शिक्षण, विवेकावीना विकास, मानवतेविना विज्ञान आणि त्यागाविना पूजन हे गांधीजींनी सांगितलेले सप्तदोष समाजजीवनात दिसत आहेत.परिणामी हुकूमशाही प्रवृत्तीचे फोफावते आहे.लोकशाहीत जनतेच्या संपत्तीवर आधारित राज्यव्यवस्था, विचार-उच्चार -संचार -संघटन- अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य गृहीत धरले आहे आहे. त्याचबरोबर सत्तेचे विकेंद्रीकरण हे ही आदर्श लोकशाहीचे द्योतक असते. पण अलीकडे सत्तेचे कमालीचे केंद्रीकरण होताना दिसत आहे हेही ही लोकशाही समोरील आव्हाने आहे.

राजकारणातून साधनशुचिता हरवणे हे फार धोकादायक आहे. आज लोककल्याणाच्या मूव्हमेंट संपवुन नेतृत्वाचा इव्हेंट करण्याकडे भर आहे.सर्व नीतिमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. राजकारणाचे रंग बदलले आहेत. राजकारणाने सेवेचे नाव घेत केवळ आणि केवळ सत्ताकारणाचा वेष परिधान केला आहे. स्वातंत्र्य आंदोलनात व स्वातंत्र्यानंतरही काही दशके राजकीय  नेतृत्वाकडे लोकशाहीची चांगली प्रेरणा होती. मात्र आज त्याऐवजी सत्तेची व प्रसिद्धीची प्रेरणा दिसू लागली आहे. पंचा नेसणारा राष्ट्रपिता ते दहा लाख रुपयांचा सूट घालणारे  प्रधान सेवक हा प्रवास सुद्धा राजकारणाच्या पर्यायाने लोकशाहीच्या कंगालीकरणाचे लक्षण आहे. पक्ष आणि नेते राज्यघटनेच्या चौकटीत न राहता आपल्या चौकटीत राज्यघटनेला आणू पाहत आहेत हे ही लोकशाही समोरील आव्हान आहे.

‘आहे रे आणि नाही रे ‘वर्गातील दरी वाढत जाणे, समन्वया पेक्षा संघर्ष वाढत जाणे ,सामाजिक न्यायापेक्षा अन्याय दिसू लागणे हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नसते.लोकशाहीमध्ये समतेची दिशा गृहीत असते. समतेचा अर्थ सर्वांना समान वागवणे हा नव्हे तर समता प्रस्थापित करणे हा असतो. आज  ‘लोक ‘ एकीकडे आणि ‘शाही ‘दुसरीकडे असे दिसत आहे. नागरी अधिकार ,नैसर्गिक अधिकार, राजकीय अधिकार, आणि मानवी अधिकार या चारीही अधिकारांचा संकोच केला जात आहे.सर्व व्यवस्थांचे आणि सर्व स्वायत्त संस्थांचे राजकीयीकरण पर्यायाने तकलुपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. मीडिया आणि सोशल मीडिया सुद्धा लोकशाहीला मारक ठरणाऱ्या भूमिका घेताना दिसतो आहे. किंबहुना त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. माणसाची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता माध्यमे व सोशल मीडियाच्या भडिमारातून मारली जात आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसांचा लोकशाहीवरचा  विश्वास उडता कामा नये. सुदृढ लोकशाहीच सर्वांना चांगले जीवन देऊ शकते. हा विश्वास देण्याची गरज आहे.लोकशाही समोरील आव्हाने आज दिसत असली तरी अंतिमतः  स्थिर व्यवस्था नव्हे.तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणूनच लोकशाही बाबत सतत प्रबोधन करत राहण फार महत्त्वाच आहे. ते आव्हान लोकशाही मानणाऱ्या सुबुद्ध ,सुशिक्षित,विचारी व्यक्तींनी व संस्था,संघटना,राजकीय पक्ष यांनी पेललं पाहिजे.आव्हान उभी राहिली तेंव्हा त्यांना पेलून नेस्तनाबूत करण्याच काम इथल्या लोकशाहीने केलेले आहे हा इतिहासही आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजीनी एके ठिकाणी म्हटलं होतं, ‘….. केवळ संख्याबळ हे लोकशाहीचे निदर्शक नाही. ज्या समाजाचे ते प्रतिनिधी समजले जातात त्या समाजाचे तेज, आशा व महत्त्वाकांक्षा त्यांच्यामार्फत नीट व्यक्त होत असतील तर अशा प्रतिनिधींच्या हाती असलेली सत्ता लोकशाहीशी विसंगत ठरण्याचे कारण नाही.मारपीट करून लोकशाहीचा विकास होणेच शक्य नाही. लोकशाहीची मनोवृत्ती बाहेरून लादता येणार नाही.तिचा मनातूनच उद्भव झाला पाहिजे ‘… पुढे आणखी एके ठिकाणी ते म्हणाले होते, ‘ धोक्यापासून अलिप्त कोणतीच मानवी संस्था नाही. जितकी संस्था मोठी तेवढा दुरुपयोग होण्याचा संभव जास्त.लोकशाही ही फार मोठी संस्था आहे.म्हणून तिचा अधिकाधिक दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. पण म्हणून लोकशाही टाळणे हा त्यावरचा उपाय नसून तिचा दुरुपयोग होण्याची संभाव्यता कमीत कमी करणे हा आहे.’

 

Comments